मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा मिळावी अशी मागणी कामगार कायद्या अंतर्गत नोंद असलेल्या "जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या युनियनच्या वतीने गेले वर्षभर केली जात होती. पालिका रुग्णालयाच्या संचालिका सुहासिनी नागदा यांनी पत्रकारांना रुग्णालयामध्ये सुविधा मिळावी म्हणून धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले होते.
"जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" च्या संलग्न असलेल्या व युनियनच्या ध्येय धोरणानुसार मुंबई महानगर पालिकेमध्ये नुकत्याच स्थापन केलेल्या "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" च्या पदाधिकार्यांनी महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व पक्षीय गटनेते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावावर चर्चा घडवून आणली आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनीही पत्रकारांना रुग्णालयामध्ये मोफत उपचाराची सुविधा देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच पालिकेतील पत्रकारांना "जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" व "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" यांच्या प्रयत्नाने रुग्णालयात मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.